छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : शहरातील तरुणाईला नशेच्या गर्तेत लोटणार्या ड्रग्ज तस्करांच्या मुसक्या आवळल्यानंतर आता पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी थेट त्यांच्या अनधिकृत धरे, अड्ड्यांवर बुलडोझर चालविण्याचा निर्णय घेतला आहे. ड्रग्ज विक्रीचा अड्डा बनलेली तस्करांची अनधिकृत घरे आता जमीनदोस्त होणार आहेत. पोलिस आयुक्तांनी ६० सराईत गुन्हेगारांची ब्लॅक लिस्ट मनपा आयुक्तांना १६ फेब्रुवारीला दिली होती. पालिकेने आठ दिवसांत मंगळवारपर्यंत (दि. २३) केवळ ३२ कुख्यात तस्करांच्या घरी नोटीस बजावल्या आहेत. घराच्या मालकी हक्काचे आणि बांधकाम परवानगीचे पुरावे सादर करण्यासाठी ८ दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. उर्वरित नोटीस दोन दिवसांत पोहोच होतील, असे अतिक्रमण विभागाचे प्रमुख संतोष वाहुळे यांनी सांगितले.
गेल्या दीड वर्षात पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी ड्रग्ज फ्री सिटीसाठी धडक मोहीम राबवत गांजा, एमडी, नशेच्या गोळ्या आणि कफ सिरपची रॅकेट उद्धवस्त केले. या कारवाईत ४०० हुन अधिक आरोपींना बेड्या ठोकल्या. तरीही ६० सराईत गुन्हेगार जामिनावर सुटून पुन्हा आपल्या घरातूनच नशेचा बाजार चालवीत असल्याचे समोर आले. त्यामुळे आता केवळ अटक न करता ज्या घरातून हा काळा धंदा चालतो, ते घरच पाडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुकुंदवाडीत खुनाच्या घटनेनंतर पोलिस आयुक्तांनी पुढाकार घेत मनपा आयुक्तांच्या सोबतीने रस्त्यावर उतरून शहरातील अतिक्रमणावर हतोडा चालविला. त्याचप्रकारे आता पालिकेनेही या तस्करांच्या घरांची कायदेशीर बाजू तपासून अनधिकृत घरे पाडण्यासाठी तत्परता दाखविण्याची गरज पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे.











